http://sunilbambal.blogspot.in/

Friday, August 7, 2015

साखळडोह 2

दगडाचे देव या लेखमालेत मी साखळडोह विषयी लिहिले होते ,,,,त्याच साखळडोह ला आज जाऊन आलो. 

हा डोह जाफराबाद तालुक्यातील मेरखेड गावाजवळ आहे येथे वर्षभरात हजारो भाविक येतात पण अजून हि पाहिजे तसा रस्ता नाही,,जाफराबाद रोड पासून ४ किलोमीटर अंतर त्या रस्त्यावर नुसती मोठ मोठी खडी टाकलेली आहे. त्यालाही बरेच वर्ष झाली असावी. त्यावर डांबरीकरण तर नाहीच नाही पण पावसाळ्यात पाऊस असेल तर फजितीच होईल.शेवटी शेवटी थोड्या अंतरा पर्यंत गाव जवळ आल्यावर थोडा बरा रस्ता आहे आणि चिखली-जाफराबाद रस्त्याने चिखली हून निघाले कि मराठवाड्याची बोर्डर संपलीकि चांगला रस्ता हि संपतो आणि मराठवाडा सुरु झालेले कळते ,,,वर्षनुवर्षे हा रस्ता खराब अवस्थेत आहे. का कुणास ठाऊक पण तो रस्ता फार दुर्लक्षित आहे,,,आमदार हि त्या कडे पाहिजे असे लक्ष देतात अस वाटत नाही,,,,काही असो किमान जाफराबाद रोड पासून साखळ डोह पर्यंत चा रस्ता डांबरीकरण करायला हवा.
असो
मी, ओवी आणि बायको तेथे गेलो. बायकोने भक्तिभावाने पूजा केली.
ओवी ला हि दर्शन घडविले.
मी त्यांचे फोटो काढले ,,,मी हि दर्शन घेतले.
ओवी चे जावळ वाहायचे होते ते वाहिले. ते कोठे ठेवायचे विचारले असता तेथील आजी ने डोहात टाका अस सांगितले,,,डोहाच्या पाण्याकडे बघितले ,,पाणी खूप घाण झाले आहे ,,,हिरवट रंग आला आहे त्या पाण्याला. त्याच क्षणी मनात विचार आला आपण डोहाच्या पाण्यात टाकून पाणी खराब करतोय,,,पण दुसरे मन तेथील परंपरेला आणि बायको च्या श्रद्धेला छेद देण्यास तयार नाही झाले. पाण्यातच ते जावळ वाहिले. पाऊस नसल्याने ते पाणी साचून आहे.

तेथे एक फलक आहे डोहात पोहण्यास सक्त मनाई आहे ,,,,मात्र काही म्हशी त्या डोहात मनसोक्त पोहत होत्या. त्या म्हशीचा मालकच त्यांना डोहावर घेऊन आला होता. असो पण तो फलक माणसांसाठी होता ना… त्या बिचाऱ्या म्हशीचा त्यात काय दोष. एका ने तर अख्खी बैलगाडीच डोहात टाकली होती अन सोबत अनेक बैल.
तेथे एक कुटुंब भेटले होते ते म्हणाले मुलीला मोठ्या मोठ्या गाठी झाल्या होत्या. दवाखान्यात नेत तरी फरक नाही पडला … अन आसरा ला पाया पडायला येऊ म्हंटले अन फरक पडला. म्हणून लेकराला पाया पडायला घेऊन आलो.यावर काय बोलाव काहीच सुचले नाही,,मला
जाण्याची वेळ आली होती ,,,परत जाता जाता पुन्हा एकदा हात जोडले.
चटणी पोळी चा डब्बा सोबत नेला होता ,,,तो संपविला. त्यातील १ पोळी तेथेल एका मोती ने संपविली.
थोडा वेळ बसून राहिलो,,,,,,अन नंतर परतीच्या मार्गाला लागलो.
सुनिल बांबल

No comments: