http://sunilbambal.blogspot.in/

Wednesday, October 28, 2015

चित्र आणि अतिशयोक्ती

चित्र आणि प्रत्यक्ष फोटो यातील अंतर कळणे तसे अवघड आहे किमान माझ्या चिखली सारख्या ग्रामीण भागासाठी तरी. चित्रकलेला हळू हळू स्वीकारेल आपला भाग ही, चित्रकला क्षेत्राने जागतिक पातळीवर खूप मोठा ठसा उमटविला आहे ,,,आणि जागतिक विकासात ,,,उलाढालीत ,,,चित्रकला आणि कला क्षेत्राचा ४०% वाटा आहे . पण हे क्षेत्र आपल्या भागातील खूप कमी लोकांना समजते. लाईक आणि कॉमेंट करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 
कला क्षेत्राने मारलेली भरारी कदाचित लोकांना अतिशयोक्ती वाटत असावी,,,नुकतीच बातमी होती,,,पिकासो च्या चित्राची. या चित्रकाराचे चित्र १७ कोटी डॉलर ला विकले,,,,आपल्या भारतीय चलनात विचार केला तर ते ११०० कोटी . 
मग अतिशयोक्ती वाटणारच ना.
आणि परत प्रश्न हि पडतो लोकांना काय असेल बर या चित्रात.
ते चित्र म्हणजे त्या चित्रकाराचे आयुष्य आहे . त्याने त्या क्षेत्रात जीव ओतून केलेल्या कामाला ते पैसे दिलेले असतात. तो चित्रकार आयुष्यभर चित्रकलेसाठी जगला त्याचे ते मोल असत.

Monday, September 28, 2015

कैलासाकडे जाता-जाता २८/०९/२०१५ सुनील बांबल


गेले १० दिवस कसे आनंदचे वातावरण होते. रोज गणेशा ची आरती मोठ्या उत्साही मनाने होत होती . खरच किती मज्जा येत असे, माझी ७ महिन्याची ओवी ,,आरती सुरु झाली की , तीला फार मज्जा वाटायची. सर्व आरती करीत असताना तीला अजून बोलणे येत नसूनही ती लांब लांब सूर काढून ,टाळ्या वाजवून आपणही आरतीत सहभागी आहोत हे दाखावत असे .
जय जय ( देव ) कुठे असे विचारले असता कौतुकाने ती गणेशाच्या मूर्तीकडे बघायची , खुश व्हायची .
आज सकाळी उठल्यानंतर तिला विचारले ,,,जय जय कुठे बेटा ?
आणि तिने गणेशाच्या मूर्तीकडे बघितले, मी तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपले,,,ते रोज सारखे नव्हते . कारण तिला तिचा जय जय तेथे दिसला नाही .
मी काल घरच्या गणपती ला विसर्जित करायला गेलो , सोबत भावाची मुल ,मुली होती . गणपती आम्ही घराजवळील विहिरीवर विसर्जित करायसाठी निघालो ,,,पूर्वी पाण्याचा दुष्काळ होता त्यावेळी या विहिरी चे पाणी आम्ही पिलो होतो. आज कुणीही त्या विहिरीचे पाणी पीत नाही ,,वापर मात्र करतात . १९६५ ची हि विहीर जिच्या वर मारोती संस्थान ची निशाण दिसते . विहिरीवर पोचल्या नंतर तेथे हि आम्ही आरती करत असताना सहजच माझ लक्ष त्या गणरायाकडे गेले . बघतो तर काय गणराया रडत होते ,,त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
मी आरती करता -करता डोळ्याच्या इशाऱ्याने च विचारले ,,,काय झाले राव ?
असे डोळे का भरून आणलेत ?
बाप्पा ने अगोदर माझ्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही ,,,पण न राहून शेवटी म्हणालेच,
अरे तुला सांगतो ,,,,आज गल्लो गल्ली गणेश मंडळे झाली आहेत. मोठ मोठी वर्षानुवर्षे चालत आलेली . पण खर सांगतो मला बाल गणेश मंडळात यायला खूप खूप आवडते. या बाल मंडळातील बालके माझी भक्तिभावाने आणि आनंदाने सेवा करतात. मला खूप आनंद होतो . त्या बालकाची सांगत मला खूप आवडते .अनंत चतुर्थी चा दिवस जवळ आला की माझ्या मनाची चूळबुल मला दु:खी करते. तस मला जावस वाटतच नाही …. पण काय करणार , मला ही माझ्या आई बाबा ची अन कार्तिक दादा ची आठवण येते. आणि हो आमचा नंदी सुद्धा मला सोडून राहत नाही. बाबा तपश्चर्ये ला बसल्यावर त्याला खेळायला सोबत राहत नाही ना. म्हणून मला जाव लागत .
नाइलाज असतो माझा म्हणून तर मी पुढील वर्षी येण्याची ग्वाही देऊन परतीच्या प्रवासाला लागतो .
खरतर लोकमान्य टिळक मुळे मी सार्वजनिक झालो , त्यांच्यामुळेच माझी भक्ताशी फार जवळून ओळख झाली नाही का ?
आईबाबा च्या परवानगी ने मला मस्त १०/११ दिवस भक्तामध्ये राहण्याची संधी मिळाली. त्यांनी मला बोलाविले अन मी हि आलो . त्या निमित्ताने सार्वजनिक मंडळे स्थापन झाली . इंग्रज राजवटीत जमाव बंदी असल्याने लोकमान्यांनी मला बोलवले जेणे करून या निमित्ताने का होईना ,,लोकांना एकत्र आणता येईल. त्यांना स्वतंत्र लढ्यासाठी प्रेरित करता येईल ,भाईचारा वाढेल,आपापसात प्रेम निर्माण होईल.स्वातंत्र्यासाठी सर्व पेटून उठतील,,,,,त्या वेळी बर्याच गोष्टी पूर्ण झाल्याही . अनेक जन स्वातंत्र्यासाठी तयार झालेही ,लढले ही ,,,माझे कायमचे भक्त ही झालेत आणि आजही आहेत ,,,हे पाहून मी त्यावेळ पेक्षा आज तसा जास्तच आनंदी होतो.
प तरीही या हर्षाने प्रफुल्लीत झालेली मनाची किनार आज थोडी दु:खी ही होते . ,,,हे ऐकून मला हि थोडा धक्काच बसला.
न राहवून मीच विचारले
बाप्पा नेमके झाले तरी काय ?
आमच काही चुकले काय ?
तुमच दु:ख चे कारण समजू शकेल काय ?
असे अनेक प्रश्न मनात येत होते …मी असे विचारात असतानाच बाप्पा म्हणाले ,,,अरे थांब किती प्रश्न विचारशील ….
मला सर्वच प्रिय आहेत ,,बाल गणेश मंडळाची स्थापना केल्यापासून ते आज पर्यंत मोठ्या उत्साहाने तुम्ही मला वाजत गाजत आणता ….
मोठमोठे देखावे ,साज ,मक्खर करून माझी मुखामाची व्यवस्था करता .
त्या मुळे मला खूप आनंद होतो,मी प्रसन्न असतो . माझा उंदीर ही खुशीत असतो ,,रोज त्याला लाडू ,मोदक,साखर ,खोबरखीस सारखे पदार्थ जे खायला मिळतात . पण तरीही मी तुमच्यावर काही गोष्टीवर काही मंडळातील काही भक्तावर नाराज झालोय ,,,,मंडळे माझ्या नावाने मोठमोठ्या देणग्या वसूल करतात ,त्याचा दुरुपयोग करतात ,,,आपापसात भांडण करतात आणि काही तर माझ्या समक्ष पत्त्याचा डाव मांडतात .या भक्तामुळे मला पत्त्याचे डाव हि माहित झालेत. त्यातील एखादा भक्त हरतो एखादा जिंकतो ,,,,एकाच वेळी भक्ताचे दु:ख आणि आनंद बघवत नाही मला आणि ते हि पत्त्या सारख्या वाईट मार्गातून मिळालेले.
फार वाईट वाटते मला .
किमान जाता जाता मी आशा करतो दर वर्षी च कि ,,,,,, पुढील वर्षी तरी मंडळातील माझे भक्त असे वागणार नाहीत . लोकमान्यांच्या विचारला जगतील ,,त्याचे अनुकरण करतील ,,,अजूनही मी आशावादी आहे.
माझे खूप कमी भक्त वाईट मार्गावर आहेत ,,,ते त्या मार्गाहून चांगल्या मार्गावर यावे यासाठी माझा खटाटोप असतो .
मी गणरायाकडे पाहतच राहिलो.
आणि तेव्हड्यात भानावर आलो ,,गणपती बाप्पा ला निरोप देण्यासाठी आम्ही मूर्ती विहिरी तील पाण्यात टाकली.
पाण्यात बघितले ,बाप्पा कैलासाकडे निघाले होते ,,,हिमालयाच्या दिशेने .
ते जाता जाता थबकले आणि म्हणाले तुला एक सांगायचो विसरलो तुम्ही मातीच्या मूर्ती घेत जा ,,,प्लास्टर च्या मूर्ती पाणी दुषित करतात त्यामुळ जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागतो ,,,,आणि हो गाणे थोडे चांगले लावत जा की राव.
माती च्या रूपातील माझी प्रतिकृती खरच आवडेल रे ……
येतो मी आता ….
भेटू पुढील वर्षी ……।
सुनिल बांबल

Tuesday, August 25, 2015

तुमच्या आतील कला बाहेर येऊ द्या .




कॉलेज पूर्ण झाले कि चित्रकार म्हणून जगायला सुरवात करताना,,चित्र केले कि बरेच जन ते चित्र मोठ्या कलाकारांना अथवा त्यांच्या शिक्षकांना दाखवतात. … पण मला वाटते तसे करू नये ,,,
आपल्याला जस जमते ते करत राहावे.या प्रमाणे आपण मार्गस्त झालो तर आपल्याला लवकर काही तरी सापडू शकते ,,,आणि कलाकार आणि शिक्षकाचे शिक्षण झाल्यावर मार्गदर्शन घेतले तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपणास सांगतील…तेव्हा आपल्यातील कलाकार बाहेर यायचा राहून जाऊ शकते.शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे ते कॉलेज ला असताना.
आणि आणखी एक ,,,आपले चित्र पूर्ण झाल्यावर व तुम्ही कुठे प्रदर्शित केल्यावर कुणाच्याही प्रतिक्रिया चा अति विचार करू नये… एखादा सल्ला ,सूचना हि स्वत:ला योग्य वाटल्यास पुढच्या चित्रात अमलात आणण्यास हरकत नाही.
तुमच्या चित्रावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया चा परिमाण होऊ देऊ नये ,,याची दक्षता घ्यायला हवी.
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ,,चित्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन हि वेगळा असतो,,,त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मत मांडत असतो.
तुम्हाला काय आवडते अन काय करायचे यावर ठाम राहा.
आणि बिनधास्त काम करा.
सातत्याने काम करत राहाल तर तुमच्या कामाला कुणी तरी जीव लावेलच.
त्यासाठी सातत्याने काम करत राहा जसे जमते तसे. हे माझे व्ययक्तिक मत आहे.

Friday, August 7, 2015

सृजनाच्या वाटेवर 02/07/2015


सृजनात्मक चित्राची मज्जा च न्यारी .
मी कॉलेज ला असताना पासूनच मला थोड वेगळे करावे वाटायचं.  सुरवातीला मी निसर्गचित्र करायचो,,व्यक्ती चित्र हि आवडायचं. पण व्यावसायिक चित्रकार म्हणून जगताना व्यक्तीचित्राला विकत घेणारे थोडे कमीच. आणि मी व्यक्ती चित्रणात खूप मास्टर काम करेल असेही वाटत नव्हतं. तसेच मुळातच माझा कल सृजनात्मक चित्रा कडे होता.
२००५ ला मुंबई ला गेलो असता तेथे प्रशांत शाह भेटले होते,त्यांना मी निसर्ग चित्र दाखवली आणि माझी चित्र ते विकून देतील अश्या विश्वासाने त्यांना दाखवत होतो पण त्यांनी मला खूप छान सांगितले निसर्गचित्र म्हणजे तुझ चित्र नव्हे ,,,हा तर तुझा रियाज झाला,हा तुझा आउट डोअर स्टडी चा भाग. मला त्यावेळी वाटले . या माणसाने आपले चित्र विकण्यासाठी तर ठेवले नाही पण आपल्या ला काहीही सांगून हुसकून लावले बहुतेक ,,,काय सांगू त्यावेळी मला त्यांचा रागच आला होता.मग हळूहळू मी निसर्गचित्र काढत होतो. saffronart हून माझे बरेच चित्र विकलेही गेले ,,,पण राहून राहून अस वाटायचे कि आपल्या जे करायचे ते हे नाही .
तरीही मी,,cityscape,seascape,night landscape,करत होतो,, हे चालू असतांना एक वेगळा प्रयोग म्हणून जत्रेतील पाळणे असतात ते चित्रात केवळ आकार वापरून आणि रंगाच्या फटकाऱ्या तून आणि त्यासोबत काही घराचे आकार वापरून चित्र काढत होतो पण ते सर्वापासून अनभिज्ञ होते. काही छोटे छोटे कॅनवास वर स्केच हि केले होते त्यातील ३ स्केच indianartcollectors वर टाकले असता त्यातील १ विकले. आणि माझा हुरूप वाढला मी त्यात अजून काम करायला सुरवात केली.२०१० ला नेहरू सेंटर च्या प्रदर्शन मध्ये रचना टाक यांनी माझे तीन चित्र घेतली २ night landscape आणि १ चित्र जे सृजनाच्या वाटेवर होते ते.
मला प्रदर्शक मध्ये प्रदर्शन करायचे होते तेव्हा तेथे प्रत्यक्ष काम दाखवावे लागत, मी गेलो…. काम बघून त्यांनी शो साठी date दिली. हिरा मडम म्हणाल्या ,,लांब panal मे पेंटिंग है क्या…त्यावेळी मी माझे creative च्या वाटेवरील चित्र दाखविले असता सुनिल ये तेरा बेेेटर काम है ,landscape से अच्छा ,,,ये तुझे नयी पहचान देगा । landscape तो बहुत artist करते है,सब के काम मे ज्यादा फरक नही लगता। लेकिन तेरा ये नया काम तुझे नयी पहचान जरूर दे सकता है ।
हा सल्ला माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरला पुढे मी portrait of village या सिरीज च्या चित्राचे प्रदर्शन केले ,,,त्यातील एक Couple Village नावाचे चित्र विकले गेले.
मी Portrait of villege , Karna , Banyan Tree, VillageTree ,Concreat Tree ,Concreat village , Motherland series, God of Village, Indian Fair, Wedding Series आणि सध्या Mother & Child यावर काम करत आहे.
या सर्व छोट्या छोट्या चित्र मालिका आहेत ,,,,मला जे चित्र सुचल ते मी करत असतो . या series वर आज हि माझ काम चालूच आहे.
या series करताना अनेक चित्र देश्याविदेशात पोचले. काही प्रदर्शनातून काही net च्या माध्यमातून.
 
Redears Digest सारख्या जागतिक दर्जाच्या पुस्तकाने मे २०१२ च्या अंकात प्रकाशित केले सोबत छान मानधन हि दिले.
तीन चित्रचा गाला म्युजियम मध्ये लिलाव झाला. सृजनाच्या वाटेवर चालताना मी मात्र bombay art socitye , art socitye of india, camlin art foundation, या सारख्या महाराष्ट्रातील फेमस चित्र प्रदर्शनी पासून दूर आहे. मात्र मी दर वर्षी किमान एक तरी व्ययक्तिक प्रदर्शन करतो.
जहांगीर ला मी सतत अर्ज भरले आहे आणि आता पर्यंत तीन वेळा माझा अर्ज नाकारला गेला. जहांगीर मध्ये शो करन हे कलाकारासाठी अभिमानाची बाब आहे. मी सातत्याने काम करतोय ,,,येईल कधीतरी जहांगीर चा होकार ?
जहांगीर ला शो केला म्हणजे तुमची सर्व चित्र विकली जातात अस नाही ,,,पण व्हावा आपला हि शो या जहांगीर मध्ये असे प्रत्येकाला वाटते त्यातील च एक मी हि आहे

साखळडोह 2

दगडाचे देव या लेखमालेत मी साखळडोह विषयी लिहिले होते ,,,,त्याच साखळडोह ला आज जाऊन आलो. 

हा डोह जाफराबाद तालुक्यातील मेरखेड गावाजवळ आहे येथे वर्षभरात हजारो भाविक येतात पण अजून हि पाहिजे तसा रस्ता नाही,,जाफराबाद रोड पासून ४ किलोमीटर अंतर त्या रस्त्यावर नुसती मोठ मोठी खडी टाकलेली आहे. त्यालाही बरेच वर्ष झाली असावी. त्यावर डांबरीकरण तर नाहीच नाही पण पावसाळ्यात पाऊस असेल तर फजितीच होईल.शेवटी शेवटी थोड्या अंतरा पर्यंत गाव जवळ आल्यावर थोडा बरा रस्ता आहे आणि चिखली-जाफराबाद रस्त्याने चिखली हून निघाले कि मराठवाड्याची बोर्डर संपलीकि चांगला रस्ता हि संपतो आणि मराठवाडा सुरु झालेले कळते ,,,वर्षनुवर्षे हा रस्ता खराब अवस्थेत आहे. का कुणास ठाऊक पण तो रस्ता फार दुर्लक्षित आहे,,,आमदार हि त्या कडे पाहिजे असे लक्ष देतात अस वाटत नाही,,,,काही असो किमान जाफराबाद रोड पासून साखळ डोह पर्यंत चा रस्ता डांबरीकरण करायला हवा.
असो
मी, ओवी आणि बायको तेथे गेलो. बायकोने भक्तिभावाने पूजा केली.
ओवी ला हि दर्शन घडविले.
मी त्यांचे फोटो काढले ,,,मी हि दर्शन घेतले.
ओवी चे जावळ वाहायचे होते ते वाहिले. ते कोठे ठेवायचे विचारले असता तेथील आजी ने डोहात टाका अस सांगितले,,,डोहाच्या पाण्याकडे बघितले ,,पाणी खूप घाण झाले आहे ,,,हिरवट रंग आला आहे त्या पाण्याला. त्याच क्षणी मनात विचार आला आपण डोहाच्या पाण्यात टाकून पाणी खराब करतोय,,,पण दुसरे मन तेथील परंपरेला आणि बायको च्या श्रद्धेला छेद देण्यास तयार नाही झाले. पाण्यातच ते जावळ वाहिले. पाऊस नसल्याने ते पाणी साचून आहे.

तेथे एक फलक आहे डोहात पोहण्यास सक्त मनाई आहे ,,,,मात्र काही म्हशी त्या डोहात मनसोक्त पोहत होत्या. त्या म्हशीचा मालकच त्यांना डोहावर घेऊन आला होता. असो पण तो फलक माणसांसाठी होता ना… त्या बिचाऱ्या म्हशीचा त्यात काय दोष. एका ने तर अख्खी बैलगाडीच डोहात टाकली होती अन सोबत अनेक बैल.
तेथे एक कुटुंब भेटले होते ते म्हणाले मुलीला मोठ्या मोठ्या गाठी झाल्या होत्या. दवाखान्यात नेत तरी फरक नाही पडला … अन आसरा ला पाया पडायला येऊ म्हंटले अन फरक पडला. म्हणून लेकराला पाया पडायला घेऊन आलो.यावर काय बोलाव काहीच सुचले नाही,,मला
जाण्याची वेळ आली होती ,,,परत जाता जाता पुन्हा एकदा हात जोडले.
चटणी पोळी चा डब्बा सोबत नेला होता ,,,तो संपविला. त्यातील १ पोळी तेथेल एका मोती ने संपविली.
थोडा वेळ बसून राहिलो,,,,,,अन नंतर परतीच्या मार्गाला लागलो.
सुनिल बांबल

साखळडोह आसरा १४/०६/२०१५


मी काही दिवसापूर्वी एक लेख टाकला होता,,,,
मी दगडाचे देव बनताना पाहीले आहे.
माणूस श्रद्धे पोटी दगडाला देव मानतो,,,कुणी भीती पोटी हि देव मानतो.देवाला हे करा ते करा ,,,,अस नाही केल तर देव कोपल,,,लेकराला धरल,,असे कितीतरी कारण असतात,,,,,नाही तर देवाप्रती पूर्ण श्रद्धा असते.
श्रद्धा अन अंधश्रद्धा यातूनच देव मनात घर करतो नाही का ?
प्रत्येकाचे वेगवेगळे देव त्यात
कुलदैवत वेगळे ,,,,ग्रामदैवत वेगळे ,,,देवी,गणपती,मारोती,म्हसोबा असे कितीतरी देव.
जागृत,दक्षिणमुखी, गणपती असेल तर डाव्या-उजव्या सोंडेचा असे आहेच.
आणि हो मी रिद्धी सिद्धी सह गणपतीला स्मशानात ही बगीतले आहे.
अजून एक देवाविषयी सांगावस वाटत ते म्हणजे ,,,,,,आसरा.
माझी आई नेहमी सांगायची कि साखळडोह ला आपल्या आसरा आहे ,,,मला ही लहानपणी तेथे पाया पडायला गेलो होतो ते आठवते.
त्यांनंतर खूप वर्ष आसरा च्या पाया पडायला जायचा योग आला नव्हता ,,,मात्र लग्न झाले आणि आसरा ला जायचा योग आला.आई ने सांगितले कि तुम्ही दोघे जाऊन एकदा पाया पडून या.
मी activa घेतली होतीच ,,,मग काय ठीक आहे येऊ जाऊन असे ठरले. त्या अगोदर असेच आमचे ग्रामदैवत असलेली ,,नागरतास ची देवी आणि आणि तिचीच काकू च्या शेतात असलेली स्थापना या ठिकाणी भेटी देऊन झालेल्या होत्याच.
चिखली पासून अंदाजे २५ ते ३० किलोमीटर अंतर असावे. चिखली जाफराबाद रोड वर खासगाव फाट्यावरून ४ किलोमीटर आत हे आमचे आसरा.
मेरखेड गावाच्या हद्दीत असलेले हे आसरा चे ठिकाण.
मेरखेड जवळून वाहणाऱ्या नदीमध्ये मोठा डोह आहे .या डोह च्या खोली विषयी सांगतात,,,,,
१२ बाजीचे सुम जरी आत सोडले तरी याचा ठाक लागत नाही.
आम्ही गेलो त्या वर्षी जास्त पाऊस न पडल्याने डोहामध्ये जास्त पाणी नव्हते ,,,आणि ते हि गढूळ पाणी होत. आजूबाजूने खूप साऱ्या आसरा होत्या.
या आसराना खूप लांबून लांबून लोक येतात ,,,नवस बोलतात.
आणि तो नवस खरा हि होतो.
अनेक लोक येथे मुलांचे जावळ काढण्यासाठी येतात. कुणाचा साधा नैवेद्य असतो तर कुणाचा बोकड्याचा.
मी नवस बोललेल्या स्त्रियांना भर उन्हात बिन चपला चे दंडवत घालत येताना बघितले.
सुरवातीला काही आसरा होत्या… प्रत्येकाने शेंदूर लाऊ लाऊ खूप साऱ्या आसरा केल्या आहेत.
आता त्यातील जागृत कोणत्या ते मात्र त्या आसरा नाच माहित. असो
तेथे छान छोटी छोटी दुकाने आहे ,,,पालातील.
नास्ता साठी ची हि सोय आहे ,,,पाण्याची व्यवस्था आहे ,,,तिनसेड हि केली आहे,,,
आम्ही तेथे पोचल्यावर तेथे नारळ घेतला. बाकी पूजेचे समान बायको ने आणले होतेच. बायको ने खूप भक्ती भावाने पूजा केली.
माझी बायको खूप श्रद्धाळू आहे.स्वामीसमर्थ ची ती पक्की भक्त आहे.
ती आसरा ची भक्ती भावाने पूजा करताना बघून मी हि हात जोडले. नारळ फोडला,,,, ,,,काही लोकांना त्या नारळाचा प्रसाद वाटला.
आणि परतीच्या मार्गाला लागलो.


महाबीज चा म्हसोबा १५/०६/२०१५


        आईला महाबीज मध्ये ४ रुपये रोज होता तेव्हा पासून ते निवृत्त होई पर्यंत कामाला होती. पण शेवट पर्यंत महाबीज प्रशासन ने कायम करून घेतले नाही ,,,आई ला हंगामी रोजदार म्हणूनच शेवट पर्यंत काम करत राहावे लागले.आणि निवृत्त झाल्यावर दर महा. १००० रु पेन्शन मिळते.
आई कामाला असताना आई चा जेवणाचा डब्बा घेऊन जात असे मी. मग गेले की आत आवारात कडूलिंबाच्या झाडा खाली म्हसोबा होता,,,भल्या मोठ्या दगडाला शेंदूर लावलेला आणि त्यावर चांदीचे डोळे बसविलेले होते. या म्हसोबा विषयी एक गोष्ट मी नेहमी एकली होती ती म्हणजे ,,,,महाबीज मधील म्हसोबा खूप जागृत आहे.
मी नेहमी आत गेलो की म्हसोबाच्या पाया पडायला जायचो. मग काय म्हसोबा जवळ गेलो कि मज्जा असायची. कुणी नारळ तर कुणी पेडा ठेवलेला असायचा. मग मस्त नारळ अन पेडा खायचा आणि आपला घरचा रस्ता धरायचं,,,,देवाच्या दर्शनापेक्षा माझ लक्ष त्या नारळ अन पेडयावर जास्त असायचं. नारळ तर कायमच असायचं,,,पेडा मात्र कदाचित च सापडायचा .
पेडा सापडला की मग आनंदी आनंद.
महाबीज ला चे मुख्य अभियंता जे असत…. त्यांना सर्व कामगार आणि आम्ही ही मोठे साहेब म्हणत असे..
त्यावेळी जे मोठे साहेब होते त्यांना महाबीज च्या गोडाऊन मध्ये आणखी एक गोडाऊन बांधायचं ठरविले होते. आणि त्या गोडाऊन च्या जागेच्या काही भागात हा म्हसोबा आलेला,,,,मग त्या म्हसोबाला तेथून हटवून दुसऱ्या ठिकाणी बसवायचे ठरले .सुरवातीला मनुष्य बळ वापरून त्याला हलवायचा प्रयत्न केला पण जमेना.
मग तो म्हसोबाच आकार लहान करायचं ठरले पण तो वडर माणसाकडून हि पाहिजे तसा कमी झाला नाही,,,आणि नंतर लोकांनी एक अफवा हि पसरविली. म्हणे ज्याने त्या म्हसोबाला फोडला त्याला म्हसोबा कोपला ,,,असच एकदा त्याचे चांदीचे डोळे चोरले होते तेव्हा ही त्या माणसाचे डोळे गेले म्हणे,,तो आंधळा झाला. खरंच झाला असल का ?
शेवटी म्हसोबाला लहान करूनही हटवू शकले नाही .मग ट्रक्टर चा हि वापर झाला ,,,पण काही उपयोग नाही झाला. म्हसोबा जागृत जो होता ना…
अश्या वेळी काय म्हणव सुचत नाही पण तो भला मोठा म्हसोबा न मनुष्य बळाने हलला न ट्रक्टर ने.
मग निर्णय घेण्यात आला कि म्हसोबाला गोडावून मध्ये छोटीसी जागा सोडून त्याला दक्षिणेला प्रवेशद्वार ठेवून मंदिर करायचं ठरले.
आज ही महाबीज मध्ये तो म्हसोबा आहे.
आई २०११ ला निवृत्त झाली.भाऊ आहे तेथे हंगामी रोजदार.
माझ लग्न झाल्यावर परत या म्हसोबाच्या दर्शनाला जायचं ठरले. बायको, मी अन भावाचा मुलगा.
दर्शन घेतल्यावर आम्ही महाबीज चा आतील प्लांट बघायला गेलो,,,, मी लहानपणी पासून पाहत आलेला प्लांट मी बायको ला दाखवत होतो. कशी बियाण्यावर प्रक्रिया केली जाते ते सांगत होतो. तेथे कामात असलेल्या आईच्या मैत्रिणी विचार पूस करत होत्या. आमच कौतुक करताना कासाबाई ला जीव लावा बर हे हि आवर्जून सांगत होत्या.
चिखली येथील महाबीज बियाण्यावर प्रक्रिया करणारे आशिया खंडातील सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचे प्रक्रिया केंद्र आहे .महाबीज मुळेच आमच शिक्षण झाले .नाहीतर आई ला खूप कठीण झाले असते . जी डी आर्ट ला ७०%मिळाले होते तेव्हा आई कामगार असल्याने मी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण च्या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलो होतो. १८०० रु शिष्यवृत्ती मिळाली होती.
मी दगडाचे देव बनताना पहिले आहे या लेख मालिकेतील हा लेख मधील म्हसोबा चे रहस्य नाही कळले,,,महाबीज प्रशासन ने मनुष्य आणि यंत्र अश्या दोन्ही बळाचा वापर करूनही म्हसोबा ला हटवू शकले नाही.
मी कधीही महाबीज ला गेलो कि म्हसोबा च्या पाया पडायला जातो,,,,आणि देवापुढील नारळ उचलून खातो.
माझी नजर मात्र देवापुढे कुठे पेडा दिसतो का ,,,हेच शोधत असते.