http://sunilbambal.blogspot.in/

Sunday, June 19, 2022

संपत मिस्त्री (दादा)

 संपत मिस्त्री (दादा)


मी हा फेसबुक वर लिहलेला काही वर्षापूर्वी चा लेख ,,,आज fathers day असल्याने आज ब्लॉग वर share करत आहे .अगोदर च्या लेख मध्ये काही ही काटछाट न करता येत पोस्ट करतोय.  

५ डिसेंबर २०१७ ला दादा आम्हा सर्वाना सोडून गेले. मी कधीही त्यांच्या विषयी जास्त लिहिले नाही वा उल्लेख केला नाही.


दादा विषयी थोडं सविस्तरपणे लिहावं वाटलं म्हणून आज लिहायला घेतलं.

माझे वडील तसे शांत स्वभावाचे. 

वेळप्रसंगी रागीट ही होते ,,,पण जास्त शांतच.

साधं राहणीमान ,,पांढऱ्या रंगाचे नेहरुशर्ट आणि पायजमा. पायात साधाच बूट. ( त्यांच्या भाषेत सांगायचे तर खेटर ) 

शर्ट च्या खिशात दोन-तीन डायऱ्या.

डायरीत कुणाचे फोन नंबर , पत्ते, घेतलेलं कामाची माप,,, आणि काही आकडे.

मी बऱ्याच वेळा त्यांना लाडाने पैसे मागायचो,,,लवकर नाही दिले तर खिसे चाफलायचो. बहुतेक वेळा त्यात लॉटरी चे तिकीट असायचे. 

ते शहरात जायचे तो पर्यंत नेहमीच लॉटरी चे तिकीट आणायचे. 1 लाखाच्या लॉटरी पासून ते 25 -50 लाख पर्यंत च्या लॉटरी असायच्या.पण कधीही माहेरच्या साडी सिनेमात विक्रम गोखले ना लागलेल्या लॉटरी सारखी लॉटरी त्यांची खुलली नाही. त्यांना आशा असावी आज ना उद्या लखपती होऊ म्हणून ते कायम लॉटरी तिकीट घेत राहिले.


त्यांचं आयुष्य तस खडतर च म्हणावं लागेल.

आजोबा पासून त्यांच्या जीवनाची सुरवात ,,,,त्यामुळं आजोबा विषयी थोडं.तस आई-वडील कधीमधी सांगायचे…

माझे आजोबा शेळगाव आटोळ येथून चिखलीला आले होते.त्यांची बहिण चिखली ला राहायची. आजोबा हेल्यावरून (म्हशीचा नर ) गावोगावी किराणा विकायचे,,पंढरीची वारी आली कि वारकरी व्हायचे.

माझे वडील, काका आणि आत्या असे हे तीन भावंड होते. माझ्या वडिलांचा जन्म १९३८ चा,, वडील मोठे नंतर काका व आत्या.

काका 3 वर्षांचे असताना आजी देवाघरी गेली,,,त्यावेळी आत्या तर सहाच महिन्याची होती. 

आई नाही अन वडील विठोबा भक्त मग त्या मुलांचे काय हाल असेल विचार न केलेलाच बरा.आत्या अगदीच लहान असल्याने आजोबा शेळगाव हुन त्यांच्या बहिणीकडे चिखली ला आले. चिखली येथील पूर्वी गौरक्षणवाडी नाव असलेल्या अन सद्यस्थितीत रामानंद नगर येथील मारोती संस्थान मंदिराच्या पारावर दिवस जात असे. त्यांचं बालपण या पारावर च गेलं.


परिस्थिती अशी असल्यानं वडील जास्त शिकू शकले नाही. वर्ग पाचवीत गेले असता त्यांना शाळा सोडून काम करावं लागलं.

कदाचित अजून दोन एक वर्ग शिकले असते तर त्याकाळात नोकरी ला लागले असते,,, पण हे जर तर .

असतं नशीब कुणाचं .

तस मी नशीब वैगेरे विश्वास ठेवत नाही ,,,कर्मावर विश्वास आहे माझा. 

पण नव्यानंव टक्के प्रयत्न आणि एक टक्का नशीब अस समीकरण मानतो.

काका मात्र शिकले ,,,पुढे नोकरी ला लागले.शिक्षक ते हेडमास्तर असा प्रवास करत त्यांनी वेळेअगोदर निवृत्ती  घेतली.


त्यांचे जुने दिवस माझे आई-वडील सांगायचे ,,,ते ऐकून पोटात कालवाकालव व्हायची. त्याचं लहानपण खूप कठीण होत.

तीन भावंडा साठी थोडेसे तांदूळ चा भात टाकायचे. 

तो शिजत असताना त्यात खूप सार पाणी टाकायचे.

ते फोडणी दिलेलं पाणी गरम झालं की अगोदर ते गरम पाणी तिघेही प्यायचे नंतर उरलेला तांदूळ शिजला की थोडा थोडा भात खाऊन कशी तरी वेळ मारून न्यायचे. हे लिहिताना माझे डोळे भरून आलेत. त्यांनी आमच्या वर इतके वाईट दिवस येऊ दिले नाहीत.

बहुदा आई-वडील दोघांच्या कष्टाने इतके वाईट दिवस आम्हाला दिसले नसावे. 

माझ्या तर डोळ्यासमोर ते प्रसंग च उभे ठाकायचे. 


वडिलांनी शाळा सोडून मिळेल ते काम करणं सुरू केलं.

काम करता करता श्रीधर मिस्त्री च्या हाताखाली त्यांनी सुतारी काम शिकले जोडी ला हरी मिस्त्री असायचे. बहुदा आमच्या दादा च्या तारुण्यातला त्यांचा जिगरी दोस्ताना असावा. त्या दोघांचा एक फोटो आहे तरुणपणी चा, "फुल्ल जंटलमन" वाटतात त्यात ते दोघंही. 


मी ATD ला असताना त्या फोटोवरुन ग्राफ टाकुन त्यांच पोस्टर कलर मधे पोट्रेट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता......आता मात्र इतरांच्या आई-बाबा चे पोट्रेट करुन देतो. 

त्यांचा सुतारकामाचा व्यवसाय हळूहळू वाढला.

सुतार काम करण्यात आयुष्य खर्ची झालं.

त्यांना होणारा त्रास कधीही त्यांनी बोलून दाखवला नाही.

कधी जेवणावर ताण काढला नाही.

जस समोर आलं ते खाल्लं.

संपत मिस्त्री या नावाने ते फेमस होते ,,,,बांबल हे आडनाव त्यांच्या व्यवसायात थोड्याफार लोकांनाच माहीत असावे. 

शेवटी मी फोटो फ्रेम करून आणताना तेथील माणसाने संपत मिस्त्री म्हणून ओळखले. कधी झालं कसं झालं हे आपुलकीने विचारले.

एकदा असच डीएड कॉलेजच्या कॅन्टीन मधील तवर आजोबा नी माझ्या बाबाने केलेल्या अलमारी ( लाकडी कपाट) मला दाखवल्या. 

बऱ्याच लोकांचे घर त्यांनी त्यांच्या कलाकुसरी ने सजवलं  होतं. कामात वेळ लागत असे.आजच उद्यावर व्हायचे.

कधी लोकांचे बोलणं खावं लागायचं तर कधी प्रशंसा होतं असे.

मी ही माझ्या वडिलांच्या कामात मदत करत असे कधी रंधा मारण्यासाठी तर कधी करवत ने लाकडे कापण्यासाठी.

पण माझ्या वडिलांना आम्ही कधीही या व्यवसायात यावे असे वाटले नाही.

त्यांनी शिक्षणावर भर दिला,,,पण परिस्थिती नाजूक असल्याने आणि आम्ही शिक्षणात जेमतेम असल्याने खास प्रगती करू शकलो नाही.

मी चित्रकला च शिक्षण घेतलं.

ते ही थोडं थोडक नाही तर ,,,, ATD, GDArt, Dip.A.Ed  अस विविध पदविका केल्या . एवढे शिकल्यावर सरकारी बिना पैशाने नोकरी मिळेल अशी आशा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. 

चित्रकलेमुळे मी आमचं घर उभं करू शकलो हे मात्र ते प्रत्येकाला आवर्जून सांगत असे. 

शेवटी शेवटी वडील कुणाला जास्त ओळखत नसे ,अंघोळीचा कंटाळा करत असत ,कटिंग दाढी करायला टाळायचे, बऱ्याच वेळा मी घरीच त्यांची मशिन ने कटिंग दाढी करायचो.

 

रवी दादा अन काका मध्ये त्यांचा खूप जीव होता ,,,ते आले की त्यांना खूप बरं वाटायचं. नवोदय शाळेत नोकरी ला असल्याने रवी दादा ची चिखली ला भेट कमी व्हायची,,,,ते चिखली ला आले की आमच्या घरी येत दादाची विचारपुस करत.आपुलकी च जे नातं असते ना ते असच असत.  


तो त्यांचा शेवटचा दिवस माझ्यासाठी खूप धक्कादायक ठरला.

ते त्या दिवशी रोज पेक्षा उशिरा उठले . पडून पायाला लागण्याच निमीत्त झाल,,आजारी नसतानाही त्यांचं अचानक जाण्यानं मी पुरता खचून गेलो. तो दिवस आणि ती वेळ डोळ्यासमोर आली की मला काहीच सुचत नाही, मन गहिवरून येत. ते जेथे जेथे बसायचे तेथे ते आजही बसले आहेत असा भास होतो. त्यांची खूप आठवण येते.

एकदा गेलेलं माणूस परत दिसत नाही ,,,,आपण त्या माणसाच्या आठवणी जपण्याचा , आठवून मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो. 

दादा च्या विविध आठवणी साठवून आहेत, मनात दाटलेल्या आहेत.त्यांना काही प्रमाणात आज वाट मोकळी दिली

No comments: